परभणी (प्रतिनिधी):महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा गैरफायदा घेत, आपले नातेवाईक जिवंत असतानाही त्यांची बनावट मृत्यू प्रमाणपत्रे तयार करून शासनाची तब्बल २३ लाख ४० हजार रुपयांची घोर फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परभणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात तब्बल १० वारसदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शासकीय कामगार अधिकारी तथा उपकार्यकारी अधिकारी तात्याराव एकनाथराव कराड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, माहे मे २०२३ ते जून २०२४ या कालावधीत परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या आणि गौर येथील काही लाभार्थ्यांच्या वारसदारांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे सादर केली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना नैसर्गिक मृत्यू लाभ (रु. २,००,०००/-), विधवा/वारस पेन्शन लाभ (रु. २४,०००/-) आणि अंत्यसंस्कार सहाय्य (रु. १०,०००/-) असे एकूण प्रति कामगार २ लाख ३४ हजार रुपये दिले जातात.
आरोपींनी आपले नातेवाईक (नोंदणीकृत कामगार) जिवंत असतानाही त्यांची खोटी व बनावट मृत्यू प्रमाणपत्रे तयार केली आणि कामगार आयुक्त कार्यालय, परभणी येथे सादर करून प्रत्येकी २,३४,००० रुपये याप्रमाणे १० कामगारांच्या नावे एकूण २३,४०,००० रुपये (तेवीस लाख चाळीस हजार) थेट बँक खात्यात लाटले.
चौकशीत बनावट दाखल्यांचे पितळ उघडे
सदर प्रकरणी संशय बळावल्याने प्रथम कामगार अधिकारी, परभणी यांनी सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांकडून अहवाल मागवण्यात आले असता, सादर करण्यात आलेली मृत्यू प्रमाणपत्रे पूर्णपणे बनावट व खोटी असल्याचे उघड झाले.
फसवणूक निष्पन्न झाल्यानंतर शासकीय निधीची वसुली करण्यासाठी सर्व संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यातील केवळ एका वारसदाराने (लक्ष्मण बाबुराव टाक) लाटलेली रक्कम शासनाकडे परत जमा केली. मात्र, उर्वरित १० जणांनी रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याने अखेर त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार नोंदवण्यात आली.
गुन्हा दाखल झालेले आरोपी:
धानोरा मोत्या (ता. पूर्णा) येथील आरोपी:
१. बालाजी रामजी पांचाळ (वय ७२)
२. बालाजी भिमराव कदम (वय ५६)
३. अन्नाराव धोंडीबा भालेराव (वय ६४)
४. माणिक महादु डरांगे (वय ५६)
५. मिराबाई देविदास पांचाळ (वय ३९)
६. मुक्ताबाई नामदेव डाखोरे (वय ४१)
गौर (ता. पूर्णा) येथील आरोपी:
७. दिगांबर व्यंकटी जोगदंड (वय ६०)
८. मुरलीधर नारायण जोगदंड (वय ६१)
९. ज्ञानोबा चुडामणी पारवे (वय ६१)
१०. सुमनबाई बालाजी पांचाळ (वय ५६)
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद
सरकारी कामगार अधिकारी तात्याराव कराड यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दि. ०४ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३(५), ३१६(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३८ आणि ३३९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे (FIR क्र. ०४०९/२०२६).
पोलीस निरीक्षक संजय आनंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत व्यंकटी केन्द्रे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी त्यांना कोणी मदत केली का, यामागे एखादी मोठी रॅकेट आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
