पोहेटाकळी जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य.नवनिर्मित दोन वर्गखोल्यांचे लोकार्पण उत्साहात; आणखी दोन वर्गखोल्या व शाळा परिसर सुशोभीकरणासाठी निधी देण्याचे आमदार राजेश विटेकर यांचे आश्वासन

पाथरी (प्रतिनिधी) :पोहेटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवनिर्मित दोन वर्गखोल्यांचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या वर्गखोल्यांचे भूमीपूजन यापूर्वी करण्यात आले होते. आता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या वर्गखोल्या विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या.या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

गुणवत्तेच्या जोरावर शाळेला नवी ओळख मिळवून देऊ

यावेळी बोलताना आमदार राजेश विटेकर म्हणाले की, शाळेचा परिसर, भौगोलिक वातावरण, भौतिक सुविधा आणि शिक्षकांचे ज्ञान या सर्व बाबींचा शाळेच्या गुणवत्तावाढीत महत्त्वाचा वाटा असतो. पोहेटाकळी जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या गुणवत्तेची ओळख निर्माण केली आहे.जिल्हा परिषद शाळांना स्वतःची वेगळी ओळख आणि वैभव मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आणखी दोन वर्गखोल्यांसह विविध सुविधांची मागणी

शाळेच्या मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेच्या आवारात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, व्यासपीठाचे सुशोभीकरण करणे तसेच आणखी दोन नवीन वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील आणि आवश्यक सोयी-सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार विटेकर यांनी दिले.

ग्रामविकासासोबत बौद्ध विहाराचे कामही प्रगतिपथावर

ग्रामविकासाच्या विविध कामांचा आढावा घेताना गावातील बौद्ध विहाराचे बांधकाम प्रगतिपथावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विहाराचे काम पूर्ण झाल्यानंतर तेथे भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.मतदारसंघात आतापर्यंत २१ बौद्ध विहारांची कामे पूर्ण झाली असून, नवीन यादीत आणखी ८ ते ९ बौद्ध विहारांच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती श्री.डुकरे,माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगशे,माजी सभापती राजेभाऊ ढगे,माजी जिल्हापरिषद सदस्य अनिलभाऊ नखाते, गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड, माधवरावजी जोगदंड, मदनरावजी भोसले(विटेकर), संजू काका रानेर, बाळू काका कोल्हे, हर्षवर्धनजी कोल्हे, विष्णुपंतजी काळे, नवनाथजी घांडगे,दत्ताजी वराडे, लक्ष्मीकांतजी तिडके, संदीपभैय्या टेंगशे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सरपंच, उपसरपंचांची गैरहजेरी चर्चेचा विषय

दरम्यान, या लोकार्पण सोहळ्याला गावचे सरपंच शामराव गोंगे व उपसरपंच गणेश बागल यांची गैरहजेरी विशेष चर्चेचा विषय ठरली. गावातील जिल्हा परिषद शाळेतील महत्त्वपूर्ण विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाला गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित नसल्याने याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.यासंदर्भात सरपंच शामराव गोंगे व उपसरपंच गणेश बागल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.शाळेतील ग्रुप वरील निमत्रण प्रोटोकाॅल मध्ये येत नसुन प्रोटोकाॅल नुसार आम्हाला या कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण मिळाले नसल्यामुळे आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही,असे दोघांनीही स्पष्ट केले.दरम्यान, गावातील शैक्षणिक विकासाशी संबंधित कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले होते की नाही, याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत असून, निमंत्रणाच्या मुद्द्यावरून कार्यक्रमानंतर नवी चर्चा सुरू झाली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल कोमल वाघमारेचा सत्कार

इयत्ता ७ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोहेटाकळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कोमल सखाराम वाघमारे हिचा आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तिच्या उल्लेखनीय शैक्षणिक यशाचे कौतुक करत आमदार विटेकर यांनी तिचे अभिनंदन केले. कोमलच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी ओळख मिळाली असून, इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!