धम्म, शिक्षण अन् समाजसेवेचा त्रिवेणी संगम!

सदाशिव भालेराव यांना ‘महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ जाहीर

३५ वर्षांची ज्ञानसेवा, धम्म चळवळीत भरीव योगदान आणि सामाजिक कार्याचा प्रतिष्ठेचा गौरव; १६ ऑगस्टला परभणीत होणार सन्मान

माजलगाव(प्रतिनिधी)माजलगाव तालुक्यातील आदर्श शिक्षक, धम्म चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ते तथा सदधम्म सेवा संघ, माजलगावचे अध्यक्ष सदाशिव भालेराव (गुरुजी) यांची अभिरा फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या शिक्षण, सामाजिक आणि धम्म क्षेत्रातील दीर्घकालीन व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला असून, १६ ऑगस्ट २०२६ रोजी परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मूळचे सोमठाणा (ता. माजलगाव) येथील रहिवासी असलेले सदाशिव भालेराव हे गेली ३५ वर्षांहून अधिक काळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपली आहे.

भालेराव हे श्रावस्ती बुद्धविहार तसेच सदधम्म सेवा संघ, माजलगावचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव येथे भव्य श्रावस्ती बुद्धविहाराची उभारणी करण्यात आली असून, या ठिकाणाला बीड जिल्ह्यातील एकमेव बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळख मिळाली आहे. धम्माचा प्रचार-प्रसार, बौद्ध धम्म परिषदांचे आयोजन, प्रबोधनपर व्याख्याने आणि विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी धम्म चळवळीला सातत्याने बळ दिले आहे.

शिक्षक संघटनांमध्येही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. कास्ट्राईब महासंघाच्या बीड जिल्ह्यातील नेतृत्वाची जबाबदारी त्यांनी अनेक वर्षांपासून समर्थपणे सांभाळली असून, शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे.

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत उत्कृष्ट बीएलओ (BLO) म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना तालुका व जिल्हास्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शिक्षण, धम्म, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक नेतृत्व या सर्व क्षेत्रांतील त्यांच्या बहुआयामी कार्याचा गौरव म्हणून अभिरा फाउंडेशन, महाराष्ट्र यांनी त्यांची ‘महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ साठी निवड केली आहे.

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त १६ ऑगस्ट २०२६ रोजी परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती संयोजक भदंत मुदितानंद यांनी दिली.

सदाशिव भालेराव यांना जाहीर झालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल बीड जिल्ह्यासह राज्यभरातील शिक्षक, सामाजिक, धम्म व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे माजलगाव तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!