तलाठी रजेवर असतानाच ई-फेरफार नोंदींचा ‘खेळ’; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस!

विशेष वृत्त (पाथरी):तलाठी रजेवर असताना आणि पदभाराचा कोणताही अधिकृत प्रभार दिलेला नसताना ई-फेरफार प्रणालीत बेकायदेशीररीत्या नोंदी घेतल्याचा धक्कादायक प्रकार पाथरी तालुक्यातील कानसूर सज्जा येथे उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणी उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संगीता चव्हाण यांनी संबंधित तलाठ्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ३ नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
‘साप्ताहिक स्मृतीगंध’चे मुख्य संपादक श्री. लक्ष्मण सिद्धोधन उजागरे (रा. पोहेटाकळी, ता. पाथरी) यांनी ९ जुलै २०२६ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. मौजे कानसूर सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) रजेवर असताना कोणताही अधिकृत पदभार हस्तांतरित न करता फेरफार, बोजा, बोजा कमी करणे आणि इतर नोंदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. या अर्जाची चौकशी करून दोषींवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ नुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
तपासात काय समोर आले?
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार पाथरी यांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल (२८ जुलै २०२६) सादर केला. या अहवालानुसार:
मूळ नियुक्ती बाबुलतार येथे असणारे तलाठी यांच्याकडे कानसूर सज्जाचा अतिरिक्त पदभार होता.
कानसुर सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी यांनी १६ जून २०२६ ते १९ जून २०२६ या ४ दिवसांच्या कालावधीसाठी वैयक्तिक/घरगुती कारणास्तव अर्जित रजेचा अर्ज दिला होता, जो मंजूर करण्यात आला होता.
रजेच्या या कालावधीत कानसूरचा प्रभार इतर कोणत्याही महसूल अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला नव्हता.
तरीदेखील, रजेवर असताना श्री. सानप यांनी १५ जून ते १९ जून २०२६ या कालावधीत ई-फेरफार प्रणालीचा वापर करून फेरफार क्र. ३१८५, ३१८६, ३१८७, ३१८९, ३१९० व ३१९१ अशा अनेक बोजा, बोजा कमी करणे व इतर फेरफार नोंदी नोंदवल्याचे निष्पन्न झाले.
तलाठ्याचा खुलासा अमान्य
तलाठी कानसुर सज्जा यांनी याबाबत खुलासा देताना सांगितले की, “शेतकऱ्यांचे दूरध्वनी येत होते आणि पेरणीच्या काळात पीक कर्जाच्या अडचणी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या नोंदी केल्या”. परंतु, उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा खुलासा असंयुक्तिक व अयोग्य ठरवला आहे.
मंडळ अधिकाऱ्यांनी नोंदी केल्या नामंजूर; प्रशासकीय निष्काळजीपणा उघड
रजेच्या काळात बेकायदेशीरपणे घेतलेल्या या सर्व फेरफार नोंदी बाभळगावचे मंडळ अधिकारी यांनी तपासणीअंती नामंजूर (रद्द) केल्या आहेत.
याशिवाय, नियमानुसार तलाठी रजेवर असताना नायब तहसीलदार (महसूल) किंवा Diba द्वारे DSC (डिजिटल सिग्नेचर) मधुन संबंधित गावे प्रणालीतून काढून घेणे आवश्यक होते, परंतु तहसील कार्यालयाकडूनही अशी कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही.
कडक कारवाईचे संकेत
रजेच्या काळात अशा प्रकारे परस्पर ई-फेरफार प्रणालीत नोंदी करणे ही अत्यंत गंभीर बाब असून शासकीय नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी (पाथरी) यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी कानसुर सज्जा यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी संपूर्ण अहवाल, रजा अर्ज आणि खुलाशासह प्रकरण मा. जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडे पाठवले आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!