लोणी-गुंज रोडवर महसूल विभागाचा दणका!

अवैध वाळू वाहतुकीवर पाथरी प्रशासनाची मोठी कारवाई; ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा

पाथरी तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. मा. उपविभागीय अधिकारी संगिता चव्हाण व मा. तहसीलदार भारत गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आलेल्या विशेष पथकाने मौजे लोणी-गुंज रोडवर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडक कारवाई केली.मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर लोणी-गुंज मार्गावर सापळा रचण्यात आला होता.

यावेळी विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला. संबंधित वाहन ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालय पाथरी येथे जमा करण्यात आले आहे.सदर कारवाई बाभळगाव मंडळ अधिकारी सिद्धार्थ बागुल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास तायनाक, रमेश तोंडे, नितिन गाडेकर, आबासाहेब पाते, चालक अतुल जोशी तसेच कोतवाल चौरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पथकाच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.तालुक्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे.

यामुळे महसूल प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारत अवैध धंदे करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.तहसीलदार भारत गंगावणे यांची प्रतिक्रिया :“तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत अवैध वाळू वाहतूक खपवून घेतली जाणार नाही. महसूल प्रशासनाचे पथक सतत गस्त घालत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शासनाचा महसूल व पर्यावरणाचे संरक्षण ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे मा. तहसीलदार भारत गंगावणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!