“पाथरी तहसीलदारांचा दणका; तलाठी-मंडळ अधिकाऱ्यांना ‘फिल्डवर हजर राहा, नाहीतर वेतन रोखू’चा इशारा!”

कार्यालयात गैरहजेरी, नागरिकांची हेलपाटे आणि वृत्तपत्रातील बातम्यांची घेतली गंभीर दखल

पाथरी(प्रतिनिधी)तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन गैरहजेरीमुळे नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारीनंतर अखेर पाथरीचे तहसीलदार भारत गंगावणे यांनी कडक पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी परभणी यांच्या सूचनेनुसार तहसील कार्यालयातून कडक कार्यालयीन परिपत्रक जारी करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांना गावांमध्ये नियमित उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांत तलाठी व मंडळ अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने आता शिस्तीचा बडगा उगारला आहे.जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या सजातील गावांना भेट देण्याचे वार निश्चित करून त्याची माहिती प्रशासन शाखेत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत कार्यालयीन उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकाळी गावात हजर झाल्यानंतर आणि सायंकाळी गावातून निघताना फोटो काढून तो व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात त्या दिवसाची अनुपस्थिती ग्राह्य धरून वेतन कपातीची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.तहसीलदार भारत गंगावणे यांनी रुजू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत प्रशासनात शिस्त आणण्यासाठी धडक कारवाई सुरू केल्याची चर्चा महसूल विभागात रंगली असून, नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!