सीमावाद,बीड पोलिसांची हालचाल अन् अखेर तहसीलदार गंगावणे यांची मोठी कारवाई
पाथरी(प्रतिनिधी)तालुक्यात अवैध वाळू माफियांवर नव्याने रुजू झालेले तहसीलदार भारत गंगावणे यांनी पहिल्याच धडक कारवाईत मोठा दणका दिला आहे. मा. उपविभागीय अधिकारी संगिता चवृहाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार भारत गंगावणे यांनी गठीत केलेल्या विशेष पथकाने एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई केली.
मौजे तारू गव्हाण येथील गोदावरी नदी पात्रात ट्रॅक्टर व जेसीबीच्या साहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. माहिती मिळताच तहसीलदार भारत गंगावणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाड टाकली. मात्र या कारवाईदरम्यान सीमावादाच्या मुद्द्यावरून काही काळ नाट्यमय घडामोडी घडल्या.
बीड पोलीस व पाथरी महसूल प्रशासन यांच्यातील सीमावादामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.तरीही तहसीलदार गंगावणे यांनी पथकासह धाडसी भूमिका घेत कारवाई पूर्ण केली. यावेळी जेसीबी क्रमांक एम.एच.१२ ई.बी.१६५५ तसेच हिरव्या रंगाचे विनानंबर जॉन डिअर कंपनीचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सदर वाहने पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत.
दरम्यान, मौजे बाभळगाव येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे आणखी एक ट्रॅक्टर महसूल प्रशासनाने पकडले. हे वाहनही पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.एका दिवसात दोन ठिकाणी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले असून पाथरी तालुक्यात महसूल प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आल्याची चर्चा सुरू झाली आहे. नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार भारत गंगावणे यांनी सुरुवातीलाच अवैध उत्खननाविरोधात कठोर भूमिका घेतल्याने महसूल विभागातही खळबळ उडाली आहे.या कारवाईदरम्यान तहसीलदार भारत गंगावणे, नायब तहसीलदार रमेश धोपे, ग्राम महसूल अधिकारी साजिद सय्यद, शेख परवेझ, सुखदेव चव्हाण, कोतवाल तसेच वाहन चालक अतुल जोशी उपस्थित होते.
