दुर्गंधी, डासांचा उपद्रव आणि अपघातांची मालिका; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊनही प्रशासन ढिम्म
माजलगाव (प्रतिनिधी)तालुक्यातील सोमठाणा गावात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून ग्रामपंचायतीच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या नाल्याचे सांडपाणी थेट रस्त्यावर उलटत असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधीयुक्त घाण पसरली आहे. रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्याने अक्षरशः तळ्याचे स्वरूप धारण केले असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित नाल्याची अनेक दिवसांपासून साफसफाई करण्यात आलेली नाही. परिणामी गटार तुंबून सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर येत आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा दुचाकी घसरून छोटे-मोठे अपघात झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.विशेष म्हणजे या घाण पाण्यामुळे डास आणि मच्छरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून गावात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे. उन्हाळ्यातच अशी भयावह परिस्थिती असेल तर पावसाळ्यात गावाची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गावातील काही युवकांनी या गंभीर समस्येचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. व्हिडिओमध्ये रस्त्यावरून वाहणारे गटाराचे पाणी, दुर्गंधी आणि नागरिकांची होणारी गैरसोय स्पष्टपणे दिसून येत आहे. सोशल मीडियावर ग्रामपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असतानाही ग्रामपंचायत प्रशासन मात्र अद्याप निष्क्रिय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
“गाव स्वच्छतेच्या केवळ घोषणा केल्या जातात; प्रत्यक्षात मात्र गाव घाणीच्या विळख्यात अडकले आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.आता तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून नाल्यांची साफसफाई करावी, रस्त्यावर साचलेले घाण पाणी हटवावे आणि नागरिकांना या अस्वच्छतेतून दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
