पाथरी : तालुक्यात नव्याने रुजू झालेले तहसीलदार भारत गंगावणे यांनी प्रशासनात शिस्त आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देत महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कठोर उपस्थिती नियम लागू केले आहेत. वेळेचे काटेकोर पालन करत नागरिकांची कामे जलद आणि पारदर्शक पद्धतीने मार्गी लावण्यावर त्यांनी भर दिला असून यासंदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले असून वारंवार उशिरा येणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा अथवा अनुपस्थिती सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.कार्यालयीन शिस्तीबाबत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामुळे महसूल प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली असून नागरिकांच्या प्रलंबित कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तहसील कार्यालय अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि जबाबदार बनवण्याच्या दृष्टीने ही मोहीम सुरू करण्यात आल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे.तिन दिवस विनाकारण गैरहजर राहणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती गंभीरपणे घेतली जाणार असून नियमानुसार रजा कपात व पुढील कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळेचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
“कार्यालयातील शिस्त, वेळेचे पालन आणि नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होणे याला माझे सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयात विनाकारण हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठीच शिस्त मोहिम राबविण्यात येत आहे. नियमांचे पालन करणाऱ्यांना निश्चितच प्रोत्साहन दिले जाईल, मात्र कामात हलगर्जीपणा व वेळेबाबत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.”— तहसीलदार भारत गंगावणे, पाथरी
