पाथरी ग्रामीण रुग्णालयात प्रथमच रक्तदान सेवा सुरू; आरोग्य सुविधांमध्ये ऐतिहासिक पाऊल

पाथरी (प्रतिनिधी):पाथरी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सेवेत काल एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. प्रथमच एका गरजू रुग्णास रुग्णालयातच रक्त देण्यात आले. यापूर्वी पाथरी परिसरातील रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास खाजगी रुग्णालय किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे जावे लागत होते. मात्र आता ही गैरसोय दूर होत असून स्थानिक पातळीवरच रक्तपुरवठ्याची सुविधा उपलब्ध होऊ लागली आहे.

या सकारात्मक बदलामागे पाथरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनार्दन गोळेगावकर यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रुग्णालयात अनेक आमूलाग्र सुधारणा केल्या. कर्मचारी वर्गामध्ये शिस्त निर्माण करत ड्रेस कोड सक्तीचा केला, तसेच रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार प्राथमिक उपचार मिळतील यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात आल्या. विशेष म्हणजे, आता रुग्णांना रात्री-अपरात्रीही तात्काळ उपचार मिळू लागले आहेत.

रुग्णालयात पुढील टप्प्यात डायलिसिस सुविधा सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू असून, या उपक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांचे प्रशासनिक सहकार्य लाभत आहे.

या यशामध्ये रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचेही मोलाचे योगदान आहे. डॉ. संदीप धबाले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. महाजन, डॉ. डोली मॅडम, डॉ. हर्षल देशमुख, डॉ. इक्कर, अधिसेविका पाटील सिस्टर, शोभा गुडमे सिस्टर, प्रशांत दळवी ब्रदर, अरुण गव्हाणे ब्रदर तसेच फार्मासिस्ट सलीम सर यांनी या परिवर्तनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

पाथरी ग्रामीण रुग्णालयाने अल्पावधीत केलेली प्रगती पाहता, येत्या काळात हे रुग्णालय महाराष्ट्रात आदर्श ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!