पाथरीत खत माफियांचा पर्दाफाश! कृषी विभागाचा थरारक छापा; ६ ‘काळ्या’ बाजारवाल्यांचे परवाने जप्त

पाथरी (प्रतिनिधी):शेतकऱ्यांच्या हक्काच्या खतावर डल्ला मारणाऱ्या आणि पांढरपेशी वेशात ‘काळाबाजार’ करणाऱ्या खत माफियांच्या साम्राज्याला कृषी विभागाने सुरुंग लावला आहे. पाथरी तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईलने राबवलेल्या ‘स्पेशल ऑपरेशन’मध्ये तब्बल ८ कृषी केंद्रांचे पितळ उघडे पडले असून, यातील ६ मोठ्या धेंडांचे परवाने कायमचे ‘लॉक’ करण्यात आले आहेत.

इन्व्हेंटरी’चा खेळ आणि ई-पॉशचा बनाव; असा चालायचा गोरखधंदा

एप्रिल महिन्याच्या कडक उन्हात कृषी विभागाचे अधिकारी ‘अंडरकव्हर’ तपासणीसाठी मैदानात उतरले होते. तपासात समोर आले की, या दुकानदारांच्या गोदामात खतांच्या गोण्यांचा डोंगर असतानाही, बाहेरून येणाऱ्या गरीब शेतकऱ्याला “माल संपलाय” असे सांगून माघारी धाडले जात होते. प्रत्यक्षात, ई-पॉश मशीनमध्ये नोंदी न करता खताची गुपचूप विल्हेवाट लावण्याचे ‘मोडस ऑपरेंडी’ येथे सुरू होती. रेकॉर्डमध्ये हेराफेरी करून शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या टोळीचा कृषी विभागाने पंचनामा केला आहे.

‘या’ सहा दुकानांचा परवाना ‘गुल’; कृषी विभागाची मोठी जप्ती

कृषी अधिकाऱ्यांच्या रडारवर आलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जगदंब ॲग्रो एजन्सी, वरद सीड्स, मातोश्री कृषी भंडार, सरोदय फार्मर, तेजस ट्रेडिंग आणि ओंकार ट्रेडर्स या सहा केंद्रांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर, या दुकानदारांचे पुरावे फोल ठरले आणि त्यांच्यावर कारवाईचा हातोडा पडला. “पुन्हा कायद्याचे उल्लंघन केल्यास थेट जेलची हवा खावी लागेल,” असा सज्जड दम प्रशासनाने दिला असून या कारवाईमुळे खत माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!