पाथरी तहसीलचा कारभार वाऱ्यावर! तहसीलदार हांदेश्वर यांची तडकाफडकी बदली, पण अतिरिक्त पदभार असलेले कावरखे ७ दिवसांपासून बेपत्ता; जनतेची कामे खोळंबली

पाथरी (प्रतिनिधी):येथील महसूल प्रशासनात सध्या सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. पाथरीचे तहसीलदार एस. एन. हांदेश्वर यांची महसूल मंत्र्यांनी तडकाफडकी बदली केली असून, त्याबाबतचे अधिकृत आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र, या बदलीनंतर पाथरी तहसीलचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी वाऱ्यावर पडले आहेत.शासकीय आदेशानुसार, विभागीय आयुक्तांनी सोनपेठ तहसीलचे तहसीलदार सुनील कावरखे यांच्याकडे पाथरी तहसीलचा अतिरिक्त पदभार सोपवला आहे. मात्र, आदेश निघून सात दिवस उलटले तरी नूतन प्रभारी तहसीलदार कावरखे यांनी पाथरी तहसील कार्यालयाकडे पाठ फिरवली आहे. आठवडाभर उलटूनही त्यांनी पदभार स्वीकारण्यासाठी एकही दिवस हजेरी न लावल्याने पाथरी तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

निवडणुकीचे कारण पुढे:

आमच्या प्रतिनिधीने तहसीलदार सुनील कावरखे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता, “सोनपेठ तालुक्यामध्ये सध्या निवडणुकीची कामे सुरू असल्याने मला पाथरीत येणे शक्य झाले नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र, एका तालुक्याचा कारभार सांभाळताना दुसऱ्या तालुक्याचे नुकसान होत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कामकाज ठप्प, कर्मचारी बेफिकीर:

पाथरी हे क्षेत्रफळाने मोठे आणि प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचे तालुका केंद्र आहे. सध्या जनगणना पूर्व कामांसह, विद्यार्थ्यांचे दाखले आणि शेतकऱ्यांची विविध महत्त्वाची कामे मार्गी लावणे आवश्यक आहे. मात्र, मुख्य अधिकारीच उपस्थित नसल्याने तहसील कार्यालयातील इतर कर्मचारीही निर्धास्त झाले असून, अनेक जण काही ना काही कारण सांगून कार्यालयाबाहेरच दिसून येत आहेत. परिणामी, दूरवरून येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाती परत जावे लागत आहे.

निवासी तहसीलदारांकडे चार्ज का नाही?

जर प्रभारी तहसीलदार कावरखे यांना निवडणुकीच्या कामामुळे पाथरीला येणे शक्य नसेल, तर त्यांनी पाथरीचे निवासी तहसीलदार रमेश धोपे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार का सोपवला नाही? असा सवाल नागरिक विचारत आहेत. निवासी तहसीलदारांकडे अधिकार प्रदान केल्यास जनगणनेची कामे आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामे सुरळीत होऊ शकतील. वरिष्ठांनी या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन पाथरी तहसीलचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून केली जात आहे.

पाथरी तहसीलचा ‘गोंधळ’ चव्हाट्यावर! तहसीलदार म्हणतात ‘वेळ नाही’, तर एसडीओंचा दावा ‘चार्ज घेतलाय’; सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!

येथील महसूल प्रशासनातील अनागोंदी कारभार आता शिगेला पोहोचला आहे. पाथरीचे तहसीलदार एस. एन. हांदेश्वर यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सोनपेठचे तहसीलदार सुनील कावरखे यांची अतिरिक्त पदभारासाठी नियुक्ती करण्यात आली. मात्र, आठवडा उलटूनही कावरखे यांनी पाथरी तहसीलकडे पाठ फिरवल्याने तालुक्यातील शासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.सध्या तालुक्यात जनगणनेची अत्यंत महत्त्वाची कामे सुरू आहेत. तसेच शैक्षणिक वर्ष जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी मोठी गर्दी होत आहे. शेतकरीही विविध कामांसाठी तहसीलमध्ये चकरा मारत आहेत. मात्र, कार्यालय प्रमुखच नसल्याने कर्मचारी बेफाम झाले असून, पाथरी तहसीलचा कारभार सध्या पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.

महत्त्वाच्या प्रतिक्रिया:तहसीलदार सुनील कावरखे:

“सोनपेठ तालुक्यामध्ये सध्या निवडणुकीचे कामे चालू असल्याने मला पाथरीत येणे शक्य झाले नाही,” अशी कबुली त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. **

उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण: या प्रकरणावर एसडीओ संगीता चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “सुनील कावरखे यांनी पाथरीचा चार्ज घेतला आहे.

“प्रशासनाचा सावळागोंधळ:

तहसीलदार स्वतः “आलो नाही” म्हणतात आणि वरिष्ठ अधिकारी “चार्ज घेतला” म्हणतात, या परस्परविरोधी विधानांमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जर कावरखे यांना येणे शक्य नव्हते, तर निवासी तहसीलदार रमेश धोपे यांच्याकडे हा कार्यभार सोपवून जनतेची अडवणूक का थांबवली गेली नाही, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. पाथरी तहसील कार्यालयामध्ये सध्या कोणीही जबाबदार अधिकारी नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!