डिजिटल युगाचा ‘डिजिटल’ चार्ज! पाथरीत न येताच कावरखे तहसीलदार झाले; भन्नाट प्रतिक्रियेमुळे महसूल विभाग चक्रावला

पाथरी (प्रतिनिधी):पाथरी तहसीलच्या रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारण्यावरून सध्या महसूल विभागात एक आगळावेगळा ‘विक्रम’ प्रस्थापित झाला आहे. सोनपेठचे तहसीलदार सुनील कावरखे यांनी पाथरीचा चार्ज घेतल्याचे सांगितले असले तरी, गेल्या सात दिवसांत त्यांनी पाथरी तहसीलची पायरीही चढली नसल्याचे समोर आले आहे. मग पाथरीत न येताच त्यांनी हा चार्ज घेतला कसा? यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

काय आहे कावरखे यांची ‘भन्नाट’ प्रतिक्रिया?

आमच्या प्रतिनिधीने जेव्हा या विसंगतीबाबत विचारणा केली, तेव्हा कावरखे यांनी प्रशासकीय गुंतागुंत अधिकच वाढवणारी प्रतिक्रिया दिली:”मी पाथरीचा चार्ज घेतला आहे, पण सोनपेठमधील निवडणूक कामांच्या व्यस्ततेमुळे मला प्रत्यक्ष पाथरी तहसील कार्यालयात हजर राहणे शक्य झाले नाही. सध्या मी सोनपेठमधूनच पाथरीचा कार्यभार पाहत आहे.”

नागरिकांचा सवाल: खुर्ची सोनपेठला अन् चार्ज पाथरीचा?

तहसीलदारांच्या या दाव्यामुळे पाथरीतील शेतकरी आणि विद्यार्थी मात्र संभ्रमात आहेत. जर तहसीलदार प्रत्यक्ष कार्यालयातच आले नाहीत, तर जनगणनेची महत्त्वाची कागदपत्रे, विद्यार्थ्यांचे दाखले आणि इतर अर्जांवर स्वाक्षऱ्या कशा होणार? डिजिटल स्वाक्षरीचे युग असले तरी, अनेक कामांसाठी तहसीलदारांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि कार्यालयावर वचक असणे गरजेचे असते.

प्रशासकीय ‘अदृश्य’ कारभार

एकीकडे उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांनी कावरखे यांनी चार्ज घेतल्याचे सांगून पाठराखण केली आहे,तर दुसरीकडे खुद्द तहसीलदार “येणे शक्य झाले नाही”असे सांगत आहेत. यामुळे पाथरी तहसीलमध्ये ‘अधिकारी आहे पण दिसत नाही’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कार्यालय प्रमुख नसल्याचा फायदा घेत कर्मचारीही ‘रिलॅक्स’ मोडमध्ये असून सर्वसामान्य जनतेला मात्र हेलपाटे मारावे लागत आहेत.जर सोनपेठमध्ये कामाचा व्याप जास्त होता, तर पाथरीचा चार्ज निवासी तहसीलदार रमेश धोपे यांच्याकडे देऊन जनतेला दिलासा का दिला गेला नाही? या ‘डिजिटल किंवा अदृश्य’ चार्जमुळे पाथरी तालुक्यातील विकासकामे आणि जनगणनेचे काम सध्या वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!