साहेबांना ‘जिल्हाधिकारी कार्यालय’ दाखवलं! पाथरी तहसीलदारांची तडकाफडकी रवानगी
पाथरी (प्रतिनिधी):महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने आज एका महत्त्वाच्या आदेशाद्वारे पाथरी (जि. परभणी) येथील तहसीलदार श्री. एस. एस. हांदेश्वर यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्याविरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत, सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने ही कारवाई करण्यात आली असून यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारींची दखल आणि प्रशासकीय कारवाई
महसूल व वन विभागाने २२ एप्रिल २०२६ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार (बदली-२०२५/प्र.क्र.२८६/आस्था-३), हांदेश्वर यांच्यावर प्रशासकीय कारणास्तव तसेच सार्वजनिक सेवेच्या हितार्थ ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात काही गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्याची दखल घेत शासनाने त्यांना कार्यरत पदावरून एकतर्फी कार्यमुक्त केले आहे.
कठोर पाऊल:
जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरीचे आदेश बदलीच्या या आदेशात असे स्पष्ट करण्यात आले आहे की:श्री. हांदेश्वर यांच्या नवीन पदस्थापनेचे (Postings) आदेश अद्याप प्रलंबित असून ते स्वतंत्रपणे काढले जातील. तोपर्यंत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होऊन आपली दैनंदिन उपस्थिती नोंदवणे अनिवार्य आहे. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. तात्पुरता पदभार सोपवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना यासंदर्भात विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पाथरी तहसीलदार पदाचा कार्यभार शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत इतर कोणत्याही कार्यक्षम अधिकाऱ्याकडे आजच्या आज सोपवून त्याचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश महाराष्ट्र शासनाचे उप सचिव महेश वरूडकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत. पाथरी परिसरात सातत्याने विकासकामे आणि प्रशासकीय पारदर्शकतेवर चर्चा सुरू असतानाच ही मोठी कारवाई झाल्याने स्थानिक राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
