जि. प. विषय समिती सभापती निवडीत महिलांचीच बाजी -भाजप दोन, राष्ट्रवादी व शिवसेनेस प्रत्येकी एक सभापतीपद

परभणी(प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतीच्या निवड बैठकीत महिला सदस्यांनीच बाजी मारली आहे. त्यामध्ये महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी ऐश्वर्याताई चव्हाण, समाजकल्याण समिती सभापतीपदी पार्वतीबाई मुंडे तर उर्वरित दोन विषय समिती सभापतीपदी वैशालीताई जाधव व कौशल्याबाई शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात गुरुवारी(दि. २) दुपारी दोन वाजता विषय समिती सभापतीपदाची निवड बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत चारही सभापतीपदी महिला सदस्यांनीच बाजी मारली. विषय सभापती निवड बैठकीचे पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले हे होते. बैठकीपूर्वी दुपारी बारा वाजेपर्यंत दोन तास नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला. यात महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाले. तर उर्वरित दोन समित्यांसाठी एकापेक्षा अधिक नामनिर्देशनपत्र दाखल झाले. त्यामध्ये सदस्य माणिकराव हरकळ, सरूबाई जाधव, ऐश्वर्या चव्हाण, कौशल्याबाई शिंदे, सुचिता भरोसे आदी सदस्यांच्या नामनिर्देशनपत्रांचा समावेश होता. तर दुसऱ्या विषय विषय समिती सभापतीपदासाठी वैशाली जाधव, दिपालीताई चौधरी, संग्राम जामकर, कौशल्याबाई शिंदे, सविताबाई मुरकुटे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. मात्र प्रत्यक्ष निवड बैठक सुरू झाल्यानंतर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या कालावधीत अनेक नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात आले. त्यामुळे उर्वरित दोनही विषय समिती सभापतींची देखील बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये वैशालीताई पंकज जाधव आणि कौशल्याबाई तुकाराम शिंदे बिनविरोध निवड झाली. या निवडीत भारतीय जनता पक्षाच्या पोखर्णी नसिंह गटातील सदस्य ऐश्वर्याताई अजय चव्हाण आणि गंगाखेड तालुक्यातील कोद्री जिल्हा परिषद गटाच्या सदस्य पार्वतीबाई प्रल्हादराव मुंडे यांचा समावेश आहे. तर विषय समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताडबोरगांव जिल्हा परिषद गटातील सदस्य वैशालीताई पंकज जाधव आणि शिवसेनेच्या मानवत तालुक्यातील केकरजवळा जिल्हा परिषद गटातील सदस्य कौशल्याबाई तुकाराम शिंदे यांची वर्णी लागली आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेत आता अधिकारी आणि पदाधिकारी वर्गात महिलांचा सहभाग ठळक झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लताताई वाकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम तसेच समाजकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भोजने आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सविता बिरगे – वाडियार आदींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!