परभणी, दि. 11 (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील 9 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्रातही एप्रिल 2026 मध्ये हा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेल्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार मॅपिंगची प्रक्रिया स्पष्ट केली. यामध्ये सन 2002 च्या अंतिम मतदार यादीतील मतदारांचे सन 2025 च्या मतदार यादीतील मतदारांशी मॅपिंग करणे तसेच सन 2002 च्या मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांचे त्यांच्या आई-वडील अथवा आजी-आजोबा (Progeny Mapping) यांच्या नोंदीशी मॅपिंग करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी एसआयआर संदर्भात उपस्थित केलेल्या विविध शंकांचेही निरसन करण्यात आले.
जिल्ह्यातील 1 हजार 623 मतदान केंद्रांवर राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमणे आवश्यक असल्याचे सांगून आगामी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने तात्काळ बीएलए नेमणुका करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी केले. तसेच बीएलए यांच्या कामाचे महत्त्वही त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांच्यासह गजानन चिभडे (शिवसेना), ओंकार दुधाटे (भारतीय जनता पार्टी), रामराजे महाडीक (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), शेख हुसेन (आम आदमी पार्टी), अॅड. इम्तीयाज खान (AIMIM), जाफर खान (बहुजन समाज पार्टी), नरेश यरेळकर व लखन पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
