पाथरी (प्रतिनिधी): गोदावरी नदीपात्रातून चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध पाथरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रेणुका माता मंदिर परिसरातील कच्च्या रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा लाल रंगाचा टिप्पर पकडला असून, सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.गुप्त बातमीदाराने फोडले बिंगमिळालेल्या माहितीनुसार, ९ मार्च २०२६ रोजी पाथरी पोलीस ठाण्याचे पथक पोलीस निरीक्षक श्री. लक्ष्मण केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व परिसरात गस्त घालत होते.
यावेळी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली की, गोदावरी नदीच्या पात्रातून एका लाल रंगाच्या टाटा टिप्परमधून (क्र. MH-22-DT-1844) विनापरवाना वाळू चोरून ती विक्रीसाठी नेली जात आहे.पोलीस पथकाचा धाडसी सापळामिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ रेणुका माता मंदिर परिसरातील कच्च्या रस्त्यावर मोर्चेबांधणी केली. सायंकाळी १८:०० वाजेच्या सुमारास संशयित टिप्पर येताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबवले. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टीची पावती नव्हती. अधिक तपास केला असता, शासकीय महसूल बुडवून नैसर्गिक साधनसंपत्तीची चोरी होत असल्याचे स्पष्ट झाले. मुद्देमाल जप्त आणि आरोपीवर गुन्हाया कारवाईत पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा जुना वापरता लाल रंगाचा टिप्पर जप्त केला आहे. याप्रकरणी लक्ष्मण आसाराम चिंचाणे (वय २७, रा. माळीवाडा, ता. पाथरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार बालाजी ज्ञानोबा लटपटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ६२ नुसार गुन्हा (C.R. No. 128/26) नोंदवण्यात आला आहे.वाळू तस्करांना पोलिसांचा इशारागोदावरी पात्रातून होत असलेल्या अवैध उपशामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी अवैध व्यवसायांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री. आदाने करत आहेत.
