विशेष बातमी/पाथरी:
गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि तस्करीवर अखेर वरिष्ठांच्या पथकाने धडक कारवाई करत वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. मा. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कारवाई करत मौजे गुंज (ता. पाथरी) येथील नदीपात्रात छापा टाकून सुमारे ६० लाख ५० हजार रुपये किमतीचे ७ ट्रॅक्टर जप्त केले आहेत.
या धडक कारवाईत पो ह/ १२३३ वाघमारे, पो ह/१२६६ चुडावकर, पो शि/ ९११ वाव्हळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अमलबजावणी पथकाने विशेष योगदान दिले. मा. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक थेट कारवाईसाठी मैदानावर उतरल्याने पाथरीतील स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल (तहसील) यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे.
तहसील व पोलीस प्रशासनाचे वाळूमाफियांशी साटलोटे?
दीर्घकाळापासून गुंज आणि परिसरात गोदावरीच्या पात्रातून दिवस-रात्र बेकायदेशीर वाळूचा उपसा सुरू होता. हा संपूर्ण प्रकार पाथरी तहसील कार्यालय व स्थानिक पोलिसांच्या नाकाखाली सुरू असतानाही त्यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. स्थानिक महसूल व पोलीस यंत्रणा याकडे डोळेझाक करत होती की वाळूमाफियांना त्यांचे अभय होते, असा संशय आता बळावला आहे.

कारवाईची प्रमुख वैशिष्ट्ये व घटनाक्रम:
वरिष्ठांचा छापा: परभणी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने व स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २१ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे २.०० वाजता गुंज शिवार येथे छापा टाकला.
माफियांची पळापळ: पोलिसांचे पथक येताच ट्रॅक्टर चालकांनी भरलेली वाळू जागीच खाली सांडून वाहने सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
मुद्देमाल जप्त: विना नंबर प्लेटचे ७ ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण ६०,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हे दाखल: आरोपींवर बीएनएस (BNS) सह पर्यावरण संरक्षण कायदा, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

हप्तेबाजीच्या चर्चांना उधाण
स्थानिक प्रशासनाला गुंज पात्रातील या महसूल बुडवणाऱ्या तस्करांची माहिती नव्हती, यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयातील विशेष पथकाला परभणीवरून येऊन कारवाई करावी लागते, यातच पाथरी तहसील व पाथरी पोलिसांचे अपयश स्पष्ट दिसते. या प्रकारामुळे निष्क्रीय व संशयास्पद भूमिका घेणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून कडक कारवाई होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
