परभणी:स्वच्छता सेवेचे टेंडर मंजूर करण्याच्या बदल्यात ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश दगडोबा खंदारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही धडाकेबाज कारवाई आज, ८ एप्रिल २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय परिसर, पालम येथे करण्यात आली.
नेमकी घटना काय?
तक्रारदार यांच्या भावाच्या नावे ‘परिवर्तन लेबर कॉन्ट्रॅक्टर अँड मल्टी सर्व्हिस’ ही फर्म आहे. या फर्ममार्फत पालम ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता सेवेसाठी २७ मार्च २०२६ रोजी कोटेशन बेसवर टेंडर भरण्यात आले होते. हे टेंडर मंजूर करण्याच्या बदल्यात डॉ. रमेश खंदारे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
लाचेच्या मागणीनंतर तक्रारदाराने नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची पडताळणी केली असता, तडजोड अंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले. डॉ. खंदारे यांनी टेंडर मंजुरीचे आदेश तक्रारदाराच्या हातात देऊन लाचेची रक्कम तातडीने घेऊन येण्यास सांगितले.आज दुपारी ग्रामीण रुग्णालय परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने डॉ. खंदारे यांना ताब्यात घेतले.
अंगझडती आणि जप्ती
आरोपी डॉ. खंदारे यांच्या अंगझडतीमध्ये २,१२० रुपये रोख आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये १५,००० रुपयांची अतिरिक्त रोकड मिळून आली आहे. सध्या आरोपीच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू आहे.कायदेशीर प्रक्रियायाप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी लोकसेवकाला पथकाने ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना रीतसर अटक करण्यात येणार आहे.
कारवाई करणारे पथक:मार्गदर्शन: पोलीस अधीक्षक कार्यालय, एसीबी नांदेड परिक्षेत्र.सापळा अधिकारी: बाबासाहेब थोरे (पोलीस निरीक्षक, एसीबी नांदेड).तपास व पर्यवेक्षण: श्री. महेश पाटणकर (पोलीस उप अधीक्षक, एसीबी परभणी).
