महिलांच्या सुरक्षिततेसाठी तक्रार समित्या प्रभावीपणे कार्यरत ठेवा : रुपाली चाकणकरमहिलांनी निर्भयपणे तक्रार करावी; बालविवाहाविरोधात कडक कारवाईचे निर्देश

परभणी, दि. ९ (प्रतिनिधी) : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानपूर्वक व भेदभावमुक्त वातावरण मिळणे आवश्यक असून शासकीय व खाजगी आस्थापनांनी स्थापन केलेल्या तक्रार निवारण समित्यांनी प्रभावीपणे कार्य करावे, असे आवाहन रुपालीताई चाकणकर यांनी केले. तसेच परभणी जिल्हा पूर्णपणे बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या तक्रार समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावाड, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी मोनिका रंधवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चाकणकर म्हणाल्या की, सर्व कार्यालये व खाजगी आस्थापनांनी संबंधित कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून तिची माहिती दर्शनी भागात लावावी. लैंगिक छळासंबंधी तक्रार प्राप्त झाल्यास त्याची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून तीस दिवसांच्या आत निवारण करणे आवश्यक आहे. तसेच या कायद्याबाबत कर्मचारी वर्गामध्ये जनजागृती करण्यात यावी.

तक्रार समित्यांचे नियमित ऑडिट करणे आवश्यक असून त्याबाबतचा अहवाल संबंधित विभागाकडे सादर करावा. समितीचे कार्य केवळ कागदापुरते मर्यादित न ठेवता तक्रारींवर वेळेवर योग्य ती कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. बालविवाह ही समाजासाठी घातक कुप्रथा असून त्याचा मुलींच्या शिक्षण, आरोग्य व भविष्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे बालविवाह आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी. पालक, नागरिक, सामाजिक संस्था व युवकांनीही बालविवाहास विरोध करून प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन चाकणकर यांनी केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्ह्यांत वाढ होत असल्याने महिलांनी डिजिटल सुरक्षेबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.

महिलांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी ‘सायबर वेलनेस’ उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाबाबत तक्रार नोंदविण्यासाठी SHE-BOX पोर्टल उपलब्ध असून महिलांनी सुरक्षिततेसाठी या पोर्टलचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये तक्रार समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती देत महिलांनी कोणतीही भीती न बाळगता तक्रार करावी, असे सांगितले.

बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) रेखा कळम, गंगाखेड येथील दक्षता समितीच्या सदस्य सूर्यमाला मोतीपवळे तसेच विभागीय दक्षता समितीच्या अध्यक्षा अनिता सरवदे यांनी समितीच्या कामकाजाबाबत आपले अनुभव मांडले. बैठकीची प्रस्तावना महिला व बालकल्याण अधिकारी मोनिका रंधवे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!