सोनपेठ येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा मोठा दणका; ८ हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार जाळ्यात

परभणी:तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रुपये स्वीकारणाऱ्या सोनपेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. भगवान विठ्ठल मुंढे (वय ५४) असे या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

तक्रारदार (वय ७० वर्षे, रा. गंगाखेड) हे गोशाळा चालवण्याचा व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी काही इसमांनी त्यांच्या गोशाळेतून जबरदस्तीने गाय आणि वासरे नेली होती, तसेच त्यांच्या मुलीला अश्लील शिवीगाळ केली होती. याप्रकरणी तक्रारदाराच्या मुलीने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी बीट जमादार भगवान मुंढे यांच्याकडे होती.सदर अर्जावर कारवाई करण्यासाठी हवालदार मुंढे यांनी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने परभणी एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

अशी झाली कारवाई

एसीबीने २५ फेब्रुवारी रोजी निळा फाटा येथील एका रसवंती गृहावर या तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी मुंढे यांनी तडजोडीअंती ८,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. शुक्रवारी, ६ मार्च २०२६ रोजी गंगाखेड-परळी रोडवरील विश्व लक्ष्मी रसवंती गृह येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मुंढे यांना रंगेहात पकडले.

आरोपीची प्रकृती बिघडली

कारवाईदरम्यान आरोपी भगवान मुंढे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रेफर केले आहे. त्यामुळे रीतसर सूचनापत्र देऊन त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सध्या त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, सोनपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.

प्रमुख मुद्दे

:लाचखोर: भगवान विठ्ठल मुंढे (पोलीस हवालदार, ब.नं. ५५४).मागितलेली रक्कम: १०,००० रुपये.स्विकारलेली रक्कम: ८,००० रुपये.कारवाई ठिकाण: विश्व लक्ष्मी रसवंती गृह, निळा फाटा.ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणीचे पोलीस उपअधीक्षक श्री. राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!