परभणी, (प्रतिनिधी): परभणी रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना रेल्वे पोलिसांना संशयित अवस्थेत फिरणारी एक अल्पवयीन मुलगी आढळून आली. चौकशीत ती नांदेड येथून अपहरण झाल्याचे समोर आले. संबंधित मुलगी नांदेड येथील असून तिचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाणे नांदेड येथे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता रेल्वे पोलीस ठाणे नांदेड अंतर्गत दुरक्षेत्र परभणी येथे कार्यरत पोहवा २०४ राम बा. कातकडे, मपोशि २३५ शितल वाघमारे व मपोशि १०७ पूजा भरकड हे परभणी रेल्वे स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आरती सुरेश कांबळे (वय १७, रा. आंबानगर सावंगी, ता. जि. नांदेड) ही मुलगी संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. तिची सखोल चौकशी केली असता ती नांदेड येथून अपहरण झालेली असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत संपर्क साधला असता विमानतळ पोलीस ठाणे नांदेड येथे गुन्हा र.नं. ५२/२०२६ कलम १३७ (२) बी.एन.एस. अंतर्गत दाखल असल्याचे स्पष्ट झाले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.यानंतर विमानतळ पोलीस ठाणे नांदेड येथील पोलीस अंमलदार कैलास राठोड तसेच मुलीची आई पूजा सुरेश कांबळे हे रात्री ८ वाजता दुरक्षेत्र परभणी येथे हजर झाले. आवश्यक पडताळणी व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित मुलगी त्यांच्या ताब्यात देण्यात आली. या प्रकरणी पुढील कार्यवाही संबंधित पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे
