उन्हाचा तडाखा आणि नियोजनाचा फटका; पाथरीत शेतकऱ्यांचा भाजीपाला सुकला!; पाथरीतील आठवडी बाजार पुन्हा मूळ जागेवर भरवण्याची मागणी; नगर परिषद सदस्यांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

पाथरी (प्रतिनिधी):पाथरी शहरातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडी बाजार’ कोणत्याही अधिकृत ठरावाशिवाय जुन्या, अपुऱ्या जागेत हलवण्यात आल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हा बाजार पुन्हा त्याच्या मूळ जागेवर भरवण्यात यावा, या मागणीसाठी नगर परिषदेच्या अनेक सदस्यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) यांना निवेदन दिले आहे.

नेमके प्रकरण काय?

पाथरी नगर परिषद अंतर्गत दर गुरुवारी भरणारा आठवडी बाजार पूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बाजार मैदानावर भरत असे. मात्र, गेल्या १६ एप्रिल २०२६ रोजी नगरध्यक्षांनी कोणताही कौन्सिल ठराव न घेता हा बाजार अचानकपणे जुन्या आठवडी बाजारच्या जागेवर भरवण्यास सुरुवात केली. ही जागा अत्यंत अपुरी असून तेथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

गैरसोयींचा पाढा

निवेदनात नमूद केल्यानुसार, जुन्या बाजारच्या ठिकाणी खालील समस्या भेडसावत आहेत:सुविधांचा अभाव: पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, ओटे आणि सावलीसाठी छताची (टीन शेड) व्यवस्था नाही.वाहतूक कोंडी: जागा अपुरी असल्याने विक्रेत्यांना रस्त्यावर बसावे लागते, ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते.आर्थिक नुकसान: सोयीसुविधा नसल्यामुळे ग्राहक बाजारात येण्याचे टाळत आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला सुकून खराब होत असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.महिलांची कुचंबणा: गर्दी आणि नियोजनाच्या अभावामुळे महिला ग्राहकांना बाजारात फिरणे कठीण झाले आहे.

२३ एप्रिलचा अल्टिमेटम

शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बाजार मैदानावर लाखो रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. असे असताना बाजार जुन्या जागेत हलवण्याचे कारण काय? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. आगामी २३ एप्रिल २०२६ पासून बाजार पुन्हा मूळ जागेवरच भरवण्यात यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे.या निवेदनावर सभागृह गटनेते अन्सारी मोहम्मद इब्राहिम, राजेश पाटील, मो. कलिम अन्सारी, ॲड. मलीक पटेल, रंगनाथ विरकर, मिलिंद आठवे, नईम खान, अन्सारी आसफोद्दीन आणि खुरेशी रज्जाक यांच्यासह इतर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!