एकाच आदेशातील तीन निर्देश; तलाठी मंडळाकडून केवळ एका आदेशाची अंमलबजावणी?उर्वरित दोन आदेशांवर कारवाईची जबाबदारी नेमकी कोणाची? तलाठी मंडळ व उपविभागीय अधिकारी कार्यालयात समन्वयाचा अभाव की जाणीवपूर्वक टाळाटाळ?

पाथरी (प्रतिनिधी)पाथरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या सुधारित आदेशात तीन महत्त्वाचे निर्देश स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत. त्यामध्ये दि. ९ जून २०२६ चा आदेश रद्द करून ७/१२ अभिलेखातील फेरफार क्र. ४६५२ रद्द करणे, तसेच दि. २१ जून २०२२ च्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय संबंधित नोंदी पूर्ववत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मात्र, उपलब्ध माहितीनुसार तलाठी मंडळ यांनी केवळ दि. ९ जून २०२६ च्या आदेशाच्या अनुषंगाने कार्यवाही केली असल्याचे दिसून येते.

परंतु दि. २१ जून २०२२ च्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी आणि त्यानुषंगाने आवश्यक महसूल अभिलेख दुरुस्तीची कारवाई अद्याप कोणी करायची, याबाबत तलाठी मंडळ आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यातच जबाबदारी ढकलण्याचा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे.उपविभागीय अधिकारी कार्यालयाने आदेश काढून जबाबदारी संबंधित यंत्रणेकडे सोपवली, तर तलाठी मंडळाकडून उर्वरित निर्देशांच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, आदेशातील केवळ एका मुद्द्याची अंमलबजावणी करून उर्वरित आदेशांकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना कोणी दिला?सुधारित आदेशाला २० ऑगस्टपासून आज १३ सप्टेंबरपर्यंत जवळपास २४ दिवस उलटूनही सर्व निर्देशांची पूर्ण अंमलबजावणी झाली नसेल, तर या विलंबाची जबाबदारी नेमकी कोणाची? याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयाने स्पष्ट भूमिका जाहीर करून संबंधित तलाठी मंडळ व महसूल अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.

“‘अंमलबजावणी करा’ एवढेच पुरेसे नाही; नेमके काय करायचे, याचे स्पष्ट निर्देश द्या!”

“दि. २१ जून २०२२ च्या आदेशाची अंमलबजावणी करावी” एवढेच नमूद करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. त्या आदेशानुसार नेमकी कोणती नोंद रद्द करायची, कोणता फेरफार पूर्ववत करायचा, ७/१२ अभिलेखात कोणती दुरुस्ती करायची आणि त्याची कार्यवाही कोणत्या अधिकाऱ्याने करायची, याबाबत स्पष्ट व कृतीयोग्य निर्देश देणे आवश्यक होते.तलाठी मंडळाकडून जर “२०२२ च्या आदेशाची अंमलबजावणी करा” याचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित होत असेल, तर तो प्रशासनाच्या आदेशातील अस्पष्टतेचा गंभीर मुद्दा आहे. आदेश काढताना अंमलबजावणीची पद्धत, जबाबदार अधिकारी आणि कालमर्यादा स्पष्ट न केल्यामुळेच आज आदेश असूनही प्रत्यक्ष कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.त्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयाने आता केवळ आदेशाचा संदर्भ देण्याऐवजी “नेमके काय करायचे आणि कोणी करायचे?” याबाबत स्वतंत्र, स्पष्ट आणि लेखी अंमलबजावणी निर्देश द्यावेत, अशी मागणी करणे रास्त ठरेल.

उपविभागीय अधिकारी यांची प्रतिक्रिया“संबंधित तलाठी मंडळ यांना आदेशातील सर्व बाबींची अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट व लेखी निर्देश देण्यात आले आहेत. दि. २१ जून २०२२ च्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचेही आदेशात स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे आदेश अस्पष्ट असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संबंधित महसूल यंत्रणेने आदेशानुसार कार्यवाही करणे अपेक्षित असून, त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.”— संगीता चव्हाण, उपविभागीय अधिकारी, पाथरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!